श्रीगोंदा : शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व मशाल प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे निरीक्षक एस. पी. गोलांडे व मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसंगी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया २०२६ अंतर्गत शिक्षकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये अक्षय म्हेत्रे (पुणे जिल्हा परिषद), कावेरी शिंदे (पालघर जिल्हा परिषद) आणि प्रियंका सोनवणे (गडचिरोली जिल्हा परिषद) यांचा समावेश होता.
निरीक्षक एस. पी. गोलांडे यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकपदी झालेली निवड ही अभिमानास्पद बाब असून, या शिक्षकांचे यश इतर शिक्षकांसाठी देखील प्रेरणादायी आहे, असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
क्रीडा दिनानिमित्त ॲथलेटिक्स, क्रिकेट, कबड्डी व हॉलीबॉल यासह विविध क्रीडा प्रकारांचे सामने आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने क्रीडांगण दणाणून गेले.मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच दररोज किमान एक तास मैदानी खेळ खेळावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी आकांक्षा रोडे हिने मनोगत व्यक्त केले.
क्रीडा दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक कैलास ढवळे, अक्षयकुमार शिंदे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment