अक्षय म्हेत्रे यांची शिक्षकपदी निवड; नूतन मराठी विद्यालयाच्या वतीने सत्कार

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेडगाव येथील माजी विद्यार्थी अक्षय नामदेव म्हेत्रे यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


विद्यालयात शिक्षण घेत असताना मिळालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अक्षय म्हेत्रे यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालय परिवाराने अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना अक्षय म्हेत्रे म्हणाले, “जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास तसेच कुटुंब आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे शिक्षक होण्याची जिद्द पूर्ण करता आली.” आपल्या यशात विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच देविदास सोनटक्के, सोमनाथ बोरुडे, राहुल कोऱ्हाळे, नामदेव म्हेत्रे, वैशालीताई म्हेत्रे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी अक्षय म्हेत्रे यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अक्षय म्हेत्रे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post